लातूर : प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांपासून शिवाजीनगर भागात काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी महापालिका कर्मचा-यांना तोंडी सांगूनही या पाणीपुरवठ्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. तसेच लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याच निदर्शनास आणून दिले असता पिवळ्या रंगाचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शिवाजीनगर परिसरात सातत्याने येत असलेल्या दूषित पाण्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदनेही दिली आहेत. लातूर शहरातील दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात वारंवार चर्चा होऊनही यावर काहीच उपाय होत नाही. याबाबत सर्वसामान्य नागरिकांतून दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाजीनगर भागात गेल्या वर्षभरापासून स्व. विलासराव देशमुख महामार्गाच्या खोदकामामुळे पाणीपुरवठ्यात अनियमितता व दूषित पाणीपुरवठा होत आहे.
दूषित पाण्यामुळे या भागातील अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. तसेच काही जणांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय या दूषित पाण्यामुळे भविष्यात मोठी अनुचित घटना घडू शकते. या भागातील नागरिकांनी महापालिकेकडून चांगला पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर या भागातील मदनलाल गिल्डा, राजू तळेकर, तुकाराम तळेकर, संतोष काळे, राजश्री पटणे, मनीषा कुलकर्णी, शांता तळेकर, उमेश येरटे, राजू वरियानी, अनिल शास्त्री आदी नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.