29.5 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeसंपादकीय‘शिवार’ कोमेजले!

‘शिवार’ कोमेजले!

ग्रामीण भागातील जीवन, जगण्यातील घुसमट आणि समाजमनातील अस्वस्थ वर्तमान कथा-कादंबरी, नाटकांमधून मांडणारे प्रख्यात लेखक, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगनाथ बोराडे तथा रा. रं. बोराडे यांचे मंगळवारी (११ फेब्रुवारी २०२५) सकाळी ८.३० वाजता वृद्धापकाळाने एमजीएम रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा बोराडे, चार मुली प्रेरणा, तृप्ती, मंजुश्री, अरुणा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना नुकताच राज्य शासनाच्या भाषा विभागाकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

रा. रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. त्यांनी माढा, बार्शी, सोलापूर, संभाजीनगर अशा शहरांतून आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे वास्तव्य नागरी भागात होते. तरीसुद्धा मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने व तिथल्या ऋतुचक्राने घडविलेला त्यांचा मन:पिंड कायम राहिला. त्यांची साधी-सोपी लेखनशैली मराठी वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. शहरातील यंत्रशरणतेचा प्रभाव ग्रामीण जीवनावरही पडत असल्याने गावगाड्यातील पारंपरिक व्यावसायिकांचे जगणे आणि त्यातून होणारी ससेहोलपट मांडणारी ‘पाचोळा’ ही कादंबरी ५५ वर्षांपूर्वी प्रकाशित झाली.

या कादंबरीने बोराडे यांना साहित्य विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. ‘पाचोळाकार बोराडे’ असे नामाभिधान त्यांना मिळाले. ‘पाचोळा’वर एक चित्रपटही निर्माण झाला. त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीचे नाट्य रुपांतरही झाले होते. त्यांच्या आणखी तीन कादंब-यांवरही चित्रपटनिर्मिती झाली आहे. इयत्ता दहावीत असताना त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांच्या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत. ‘पाचोळा’ आणि ‘वसुली’ या कथांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले.

त्यांच्या लेखणीतून ग्रामीण समाजाचे सुख-दु:ख, संघर्ष आणि आशा-आकांक्षा व्यक्त होताना दिसतात. त्यांनी आपल्या साहित्यातून सामान्य माणसाच्या कथा मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे अपरिमित नुकसान झाले आहे. १९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथपासून ते आजतागायत त्यांचा सृजनात्मक लेखन प्रवास अविरत चालू होता. त्यांच्या पेरणी, ताळमेळ, मळणी, वाळवण, राखण, गोंधळ, माळरान, बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, बुरूज, नातीगोती, हेलकावे, कणसं आणि कडबा यासारख्या कथासंग्रहांनी मराठवाडी कष्टक-यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली. कथाकार बोराडे अशी नाममुद्रा ठळक झाल्यानंतर ते एकाच वाङ्मय प्रकारात रमले नाहीत. कादंबरी, नाट्य, विनोदी, समीक्षा, बालसाहित्य अशा बहुअंगी लेखनातून त्यांची गावसमूहातील माणसं, त्यांची ‘नातीगोती’, त्यातील ‘मरणकळा’, ‘शिवारा’ बाहेरील ‘पाचोळा’गत त्यांचे अस्तित्व, सतत ‘माळराना’वर जीवघेणे कष्ट उपसूनही कृषक समाजाच्या नशिबी आलेले ‘रिक्त-अतिरिक्त’पण. कितीही ‘पेरणी’ आणि ‘मळणी’ केली तरी चारापाण्याचे ‘सावट’ डोक्यावर नित्याचेच.

अगदी इथल्या स्त्रीच्या नशिबी आमदारपद आलं तरीही ती ‘आमदार सौभाग्यवती’ राहील हे सांगणे तसे कठीणच. म्हणून शेवटी ‘कशात काय आणि फाटक्यात पाय’ असं म्हणत नियतीचा दु:खभोग म्हणून जगू पाहणारी या दुष्काळी प्रदेशातील माणसं त्यांच्या उभ्या-आडव्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यासह मराठवाडी बोलीतून त्यांनी आविष्कृत केली. हे त्यांचे योगदान लक्षणीयच! बोराडे विशुद्ध कलावादी भूमिका ओलांडून पुढे टोकदार सामाजिक प्रश्न व समाजातील ज्वलंत वास्तव अभिव्यक्त करू लागले. मराठवाडी माणसे, स्त्रीशोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेतीभाती, निसर्ग, देव-दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामपरंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचे बेरकीपण त्यांच्या स्वभावधर्मासह रेखाटन हा त्यांच्या विविधांगी लेखनाचा स्थायीभाव ठरला.

बोराडे गेली सहा-सात दशकं वाङ्मयव्यवहार हेच आपले ‘जीवित’ मानून वाङ्मयसेवा करणारे तपस्वी होते. नव्या पिढीच्या लेखनाबाबत आस्थेने बोलणारे, वाचणारे आणि त्यातील शक्तिस्थळे मोठ्या मनाने मान्य करणारे त्यांच्यासारखे लेखक आजच्या काळात दुर्मिळच आहेत. गाव-खेड्यातून लिहिणा-या आजच्या पिढ्या त्यांच्याकडे पाहून लिहित्या झाल्या. विशेष म्हणजे त्यांनीही नव्या पिढ्यांना आस्थेने जोडून घेतले. शेतकरी समाज व संस्कृती तसेच आज विकलांग होत जाणारी कृषक व्यवस्था, कृषि केंद्रात समूहाचे प्रश्न हे त्यांच्या चिंतनाचा, आस्थेचा आणि सृजनाचा कायम केंद्रबिंदू राहिला. ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यात त्यांचा मौलिक सहभाग आहे. ते फक्त लिहित नव्हते तर लिहित्या हातांना बळ देत होते.

वैजापूर, संभाजीनगर आणि परभणी येथील महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा सर्व साहित्य-संस्थांसह, महाराष्ट्र शासन, विविध क्षेत्रांतील समाजसेवी संस्थांनी बोराडे यांना पुरस्कार व सन्मानांनी वेळोवेळी गौरवित केले आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांचे लेखन समाविष्ट झालेले आहे. १९८९ मध्ये हिंगोली येथे झालेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक संस्था, विद्यापीठे तसेच महाराष्ट्र शासनाच्या बहुविध समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आधुनिक साहित्यात ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने आपली नाममुद्रा उमटवली आहे त्या नामवंतांच्या मालिकेत रा.रं. बोराडेही विराजमान झाले आहेत. अशा या बहुरंगी साहित्यकाराला ‘एकमत’ची भावपूर्ण श्रद्धांजली. कायम बहरलेले त्यांचे निवासस्थान ‘शिवार’ आज कोमेजले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR