लातूर : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणास पाठींबा देण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शेकडो वाहनांनी हजारो मराठा समाजबांधव शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी रात्री आंतरवाली सराटीला रवाना झाले. उर्वरीत बांधव २३ व २५ जानेवारी रोजी मोठ्या संख्येत ट्रॅक्टर ट्रक टॅम्पो खासगी व सार्वजनिक वाहनांनी मुंबईस जाणार आहेत. आरक्षण मिळाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही असा आम्ही निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ते आंतरवाली सराटीस रवाना झाले. शनिवार दि. २० जानेवारी रोजी पहाटे ते आंतरवाली सराटीला पोहचले. रवाना झालेल्या नागरीकांनी त्यांना महिनाभर पुरेल एवढा शिधा सोबत घेतला आहे. आचारीही सोबत आहेत. आता आरक्षण मिळाल्यानंतरच आम्ही परत येवू असा निर्धार आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील गाव शहरातून मोठ्या संख्येत ट्रॅक्टर ट्रक, टॅम्पोने समाज बांधव मुबंईस रवाना होणार आहेत. त्यांनी त्यांना सोयीची ठरेल अशी रचना या वाहनांची केली आहे.
शिधा, गॅस, स्वयपाकांची भांडी, पाण्यासाठी मोठ्या टाक्या, पत्रवाळ्या सोबत घेतल्या आहेत. शेतीकामाचे नियोजनही त्यांनी केले असून प्रत्येक घरातून कमीत कमी एक व्यक्ती तरी या मोहिमेत सहभागी होईल, असे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सहभाग उत्सफूर्त आहे. दरम्यान जनजागृतीसाठी अनेक गावांत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आल्या असून बैठका, प्रत्यक्ष भेटी व समाजमाध्यमांवरुन या मोहीमेसाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.