नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत भारत सरकार धर्मसंकटात
सापडले आहे. वास्तविक, गेल्या महिन्यात बांगलादेशात हिंसाचार सुरू झाल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना भारतात येऊन एक महिना झाला. दरम्यान, बांगलादेश सरकारने गेल्या आठवड्यात शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केला आहे. यामुळे भारतासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भारतात राहण्यासाठी कायदेशीर आधार काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तथापि, भारत सरकारने अत्यंत गुप्तता आणि कडेकोट सुरक्षेमध्ये त्यांच्या आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहानाच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, भारत सरकारने या प्रकरणी अंतिम निर्णय काय घेणार याची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. अशा परिस्थितीत भारताकडे कोणता पर्याय असू शकतो? याबाबत कायदेतज्ज्ञांच्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेतून असे संकेत मिळाले आहेत की भारत सरकारकडे शेख हसीना यांच्या मुद्यावर तीन मार्ग खुले आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तिस-या देशात आश्रय देण्याची व्यवस्था करणे हा भारताकडे पहिला पर्याय आहे. यासोबतच त्यांना सुरक्षेची हमी मिळावी, अशीही अट असणार आहे.दुसरा पर्याय म्हणजे शेख हसीना यांना राजकीय आश्रय देणे आणि त्यांच्या तात्काळ इथे म्हणजेच भारतात राहण्याची व्यवस्था करणे. तिसरा पर्याय, हा पर्याय भारतासाठी अवघड आहे आणि कदाचित तसे करणे शक्य होणार नाही. बांगलादेशातील परिस्थिती काही दिवसांनी सुधारली तर भारत शेख हसीना यांना बांगलादेशात पाठवून राजकीय पुनरागमन करण्याचा प्रयत्नही करू शकतो, असे पर्याय भारतासमोर आहेत. भारत यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर करतो हे पहावे लागेल.