जळकोट : ओमकार सोनटक्के
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. मोजणीमध्ये कधी नव्हे ते भाजपा प्रणित महायुतीला मोठे बहुमत मिळाले. महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी सरकार आल्याबरोबर शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असे आश्वासन अनेक सभेमधून केले होते . आता राज्यभरातील शेतक-यांचे कर्जमाफीकडे डोळे लागलेले आहेत. आपणास आता सरकार स्थापन झाल्याबरोबर पहिल्या बैठकीत कर्जमाफीची गोड बातमी मिळणार अशी चर्चा सध्या शेतक-यामध्ये पहावयास मिळत आहे .
२०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहिले होते. यानंतर दोन वर्षांनी राज्यभरातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र ही कर्जमाफी देताना मोठ्या अटी ठेवण्यात आल्या होत्या. या अटीमुळे जवळपास ६० ते ७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. यामुळे या कर्जमाफीचा फायदा म्हणावा तेवढा शेतक-यांना मिळाला नव्हता तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात अशा शेतक-यांनाही सानुग्रह राशी देण्याची घोषणा केली होती. मात्र अनेक शेतक-यांना सानुग्रह राशीही मिळाली नव्हती तसेच जे नोकरदार आहेत किंवा जे शेतकरी पॅन कार्डधारक आहेत अशा शेतक-यांंनाही कर्जमाफीमधून वगळण्यात आले होते यामुळे त्याकाळी शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी होती .
यानंतर २०१९ मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार होते यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा महायुतीचे सरकार आले परंतु या सरकारच्या काळामध्ये शेतक-यांना म्हणावा तेवढा लाभ मिळाला नाही जेव्हा निवडणुका लागला त्यावेळी महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतक-यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय करू असे आश्वासन दिले होते तसेच राज्याची तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यास आपण शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन देखील दिले होते.
आता सरकार हे महायुतीचे येणार जवळपास निश्चीत झाले आहे. उद्या दि ५ डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी होणार अशी चर्चा आहे. या सरकारमध्ये जो कोणी मुख्यमंत्री होईल त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच शेतक-यांना पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सदा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षण तर कधी रोगराई यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सध्या बाजारपेठेमध्ये शेतीमालाला भाव नाहीत . शेतीमध्ये घातलेला खर्चही निघेल की नाही याची शाश्वती नाही. यावर्षी तर एवढा पाऊस झाला की शेतामध्ये शेतक-यांना तण काढण्यासाठी जाता आले नाही. पिकापेक्षा तण अधिक झाले होते यामुळे पिकाच्या उत्पादन पेक्षा शेतक-यांना शेतामध्ये वाढलेले गवत काढण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागले.