22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रशेतक-यांना आली थकित बिले

शेतक-यांना आली थकित बिले

मोफत वीज अफवाच! कृषिमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे बोट

कोल्हापूर : प्रतिनिधी
गतवेळी सरकारने सांगितले आहे की आता आणि पुढील पाच वर्षे कृषिपंपाचे वीज बिल भरायचे नाही. पण मोफत वीज मिळणार का? हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांच्या विभागांतर्गत हा विषय येतो, असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांना येत असलेल्या थकित बिलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिंदे सरकारने ‘मुख्यमंत्री बळिराजा वीज सवलत योजने’ची घोषणा केली होती. साडेसात अश्वशक्ती कृषिपंप वापरणा-या शेतक-यांना या वीज बिल माफीचा फायदा देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, राज्यातील ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतक-यांना वीज बिल माफीचा फायदा होणार होता. यासाठी १४ हजार ७६१ कोटी रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले होते.

मात्र विधानसभा निवडणूक संपताच शेतक-­यांना थकबाकी असलेली बिले मिळत आहेत. त्यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला होता. याबाबत ते म्हणाले, गतवेळी सरकारने सांगितले की, पुढील पाच वर्षे कृषिपंपाचे वीज बिल भरायचे नाही. पण मोफत वीज मिळणार का? हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांच्या विभागांतर्गत हा विषय येतो.

शेतक-­याबद्दल मी अपशब्द बोलू शकत नाही
भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात पीक विमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकाही झाली. मी शेतक-­यांबद्दल कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. शेतकरी हा राजा आहे. शेतक-­याबद्दल मी अपशब्द बोलू शकत नाही.

नुकसानभरपाई पीक विम्यातून देण्याचे काम सुरू
पिकांची नुकसानभरपाई पीक विम्यातून देण्याचे काम सुरू आहे. जे शेतकरी बाकी असतील त्यांना नुकसानभरपाई मिळेल. राज्याकडून आणि केंद्राकडून ज्या पद्धतीने पैसे उपलब्ध होतील त्या पद्धतीने देण्यात येतील, असेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
शेतक-­यांनी त्यांच्या पिकाबद्दल अडचणी सांगितल्या आहेत. त्या आम्ही नोंदवून घेतल्या आहेत. शेतक-यांच्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून निर्णय जाहीर करू, सोलार संदर्भात कोणत्याही शेतक-याला सक्ती केलेली नाही. ज्यांना हवे त्यांनी घ्यावे. पण जिथे महावितरणचे कनेक्शन पोहोचलेले नाही तिथे सोलार सिस्टीम देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR