मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म मिळाला आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून आज दुपारी ३ वाजता त्यांनी अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी मलिक यांना तिकिट मिळाले आहे. त्यामुळे भाजपचा विरोध झुगारून अजित दादांनी मलिक यांना उमेदवारी दिली, की विरोध दूर करण्यात दादांना यश आलं, हे समजलेलं नाही. विशेष म्हणजे मलिक यांच्या पारंपरिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची लेक सना मलिक विधानसभा लढवणार आहे.
त्यामुळे मुंबईतून एकाच निवडणुकीत बाप-लेक वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभेला सामोरे जाताना दिसणार आहेत. मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा मित्रपक्ष समाजवादी पक्षातर्फे विद्यमान आमदार अबू आझमी यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक हेही या मतदारसंघातून इच्छुक असताना त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांची मनधरणी करत होते. परंतु, मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले.
मलिक यांचे शक्तिप्रदर्शन
नवाब मलिक यांनी आज सकाळी भव्य शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी ते अपक्ष लढणार की राष्ट्रवादीकडून ते स्पष्ट होत नव्हते. माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावरही त्यांनी हसून हात जोडले आणि ‘मौनं सर्वार्थ साधते’ अशी भूमिका घेतली. या जागेवर महायुतीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे मलिक महायुतीतून लढणार, की पक्षचिन्हाविना लढवून मलिकांना महायुती ‘अदृश्य’ पाठिंबा देणार, असा संभ्रम होता.