33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रश्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ

श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ

नेटिझन्सचा संताप, सरकारने घेतली दखल

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खो-यातून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकिट आणि रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, देशावरील दहशतवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकिटाचे दर तीन पटींनी वाढवले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्सकडून सध्याच्या विमान तिकिटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणा-या प्रवाशांसाठी तिकिटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाइन्सला विमान कंपन्यांनी तिकिट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

डीजीसीएने २३ एप्रिल रोजी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू- काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे, श्रीनगरहून देशभरात विमानांची उड्डाणे वाढविण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरला आले आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे, स्वस्त तिकिट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबईला जाण्यासाठी असणा-या तिकिटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानुसार, तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकिट ५६ हजार रुपयांपर्यंत वाढवल्याचे एका ट्विटर युजर्सने स्क्रीन शॉट शेअर करून म्हटले. त्यामुळे, नेटिझन्सने विमान कंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून संकटात संधी शोधण्याचे काम दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचेही नेटिझन्सने म्हटले आहे.

श्रीनगरहून अतिरिक्त ४ विमानांचे उड्डाण
दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणा-या ४ विमानांची संख्या वाढवली आहे. त्यातील दोन विमाने ही दिल्लीसाठी असून २ मुंबईसाठी वाढविण्यात आली आहेत. आपली सुटी मध्येच सोडून जे घरी परतू इच्छित आहेत, त्यांसाठी ही अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR