चाकूर : प्रतिनिधी
संजीवनी वनस्पती बेट हे पर्यटक, रुग्ण ,आयुर्वेदाचार्याचे मुख्य आकर्षण केंद्र ठरले आहे. उत्तरा नक्षत्रानिमित्त आगळ्या-वेगळ्या आयुर्वेद यात्रेला मंगळवारी दि १३ सप्टेबंरपासून प्रारंभ झाला असून, ही यात्रा २७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
तालुक्यातील वडवळ नागनाथ देशभरातील एकमेव असे दुर्मिळ वनस्पतीनेयुक्त संजीवनी वनस्पती बेट हे पर्यटक, रुग्ण, आयुर्वेदाचार्याचे मुख्य आकर्षण ठरत आहे. येथील प्रसिद्ध संजीवनी वनस्पती बेटावरील वनस्पती सेवनासाठी शेकडो रुग्ण, पर्यटक उत्तरा नक्षत्रानिमित्त येतात. यंदा उत्तरा नक्षत्रानिमित्त आयुर्वेद यात्रेस आजपासून प्रारंभ झाला असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील रुग्ण, पर्यटक या बेटावर दाखल होत आहेत. यामुळे संजिवनी वनस्पती बेटावर रुग्णांची, पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसाने येथील संजीवनी वनस्पती बेट दुर्मिळ वनस्पतीने बहरले आहे. यंदा या वनस्पती बेटावर उत्तरा नक्षत्रानिमित्त आगळ्या वेगळ्या आयुर्वेद यात्रेला मंगळवारी (दि.१३) पासून प्रारंभ झाला असून ही यात्रा २७ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
या बेटावरील वनस्पतीचे तसेच बेटावरील मातीचे आयुर्वेद तज्ज्ञांनी परिक्षण केले आहे. बेटावरील माती ही लालसर रंगाची असून या मातीत लोहाचे ३३ टक्के प्रमाण अधिक असून या बेटाचा पृष्ठभाग हा समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंचीवर असल्याने येथील हवा शुद्ध असल्याने येथील वनस्पती या इतर ठिकाणच्या वनस्पतीहून गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बेटावरील वनस्पतीत उत्तरा नक्षत्रात परिपूर्ण अर्क तयार होतो म्हणूनच उत्तरा नक्षत्रात या संजीवनी बेटावर रुग्णांचा ओढा वाढून या बेटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या संजीवनी वनस्पती बेटावर अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून येतात. यात प्रामुख्याने राजहंस, निर्मळी, शंखपुष्पी, काळी टाकळी, आडुळसा, गुळवेल, शतावरी, जटाशंकर, अनंतमुळ, सर्पगंधा, सफेद मुसळी, कवचबिज, कोरफड, अरूवद, रानमिरची, भुईकोहळा, पाषाणकंद, मदनफळ, लोखंडी खडकशेपु, यासह एकूण २५९ दुर्मिळ वनस्पती या बेटावर आढळून आल्या आहेत. या बेटावर रुग्ण येऊन तीन दिवस वास्तव्य करून वनस्पतीचे सेवन करतात व चौथ्या दिवशी काळ्या साळीचा भात शिजवून त्यावर गाईचे तुप उतारा म्हणून खातात आणि ‘पत्तों में ही परमात्मा है’ असे म्हणून आपआपल्या घरी परततात; अशी ही परंपरा पुरातन काळापासून सुरू
आहे.