बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे.
देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थांतर्फे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निकम यांच्या नियुक्तीवर भाष्य केले आहे. आमची एक मागणी पूर्ण झाली आहे. बाकीच्या ६ मागण्या पूर्ण झाल्यावर अन्नत्याग आंदोलन आम्ही स्थगित करू, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, फडणवीस आणि निकम यांच्यात अडीच महिन्यांपूर्वी भेट झाली होती. निकम यांची नियुक्ती होईल, असे बोलले जात होते. धनंजय देशमुख यांना निकम हे वकील म्हणून पाहिजे होते. धनंजय देशमुख यांना निकम यांच्यावर विश्वास आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुरू होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा हीच मागणी केली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनीही ही मागणी लावून धरली होती. याच मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.