छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याण येथील एका १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना संभाजीनगर येथे उघडकीस आली आहे. येथील हॉस्टेलमध्ये राहणा-या तरुणीचे आई-वडिलांसोबत वाद झाल्याने ती हॉस्टेलमधून पळून गेली. यानंतर ती चार जिल्ह्यांत फिरली. या चारही जिल्ह्यांत चार नराधमांनी मदतीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
एका १७ वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा माग काढला, तिला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा तिने जे सांगितले, ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
समाधान शिंदे (रा. पुणे), निखिल बोर्डे (नाशिक), प्रदीप शिंदे (परभणी) आणि रोहित ढाकरे (पुसद) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संभाजीनगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली होती. पीडित तरुणी ही संभाजीनगर येथे नीटच्या परीक्षेची तयारी करते. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती.
मात्र, अभ्यासावरून तिचे आणि तिच्या पालकांचे ३० नोव्हेंबरला वाद झाले होते. या वादातून पीडित तरुणी ही रागाच्या भरात हॉस्टेलमधून निघून गेली होती. तिच्याकडे फक्त २०० रुपये होते. त्यामुळे ती बस किंवा रेल्वे अशा मिळेल त्या वाहनाने प्रवास करत नाशिक, यवतमाळ, परभणी व पुणे पुणे जिल्ह्यात फिरली. मात्र, या चारही जिल्ह्यांत तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आला.
सुरुवातीला ही तरुणी परभणीला गेली. या ठिकाणी तिला रेल्वे स्थानकावर प्रदीप शिंदे भेटला. त्याने तिला राहण्यासाठी जागा देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीने तिला पुसद येथे सोडले. यानंतर पुसदला तिच्या ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरेने तिच्यावर मदतीच्या बहाण्याने अत्याचार केला. यानंतर तरुणी ही नाशिकला गेली.
इथे पेट्रोल पंपावर काम करणा-या निखील बोर्डे याने तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केला. दरम्यान, यानंतर तरुणी ही पुण्यात आली. पुण्यात तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सीचालकासोबत झाली. यावेळी त्याने देखील मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, संभाजीनगर पोलिसांना मुलगी ही पुण्यात असल्याचे समजले. यावेळी त्यांनी तिचा शोध घेत पुणे गाठले. तिला ताब्यात घेतले असता पोलिसांनी तिची चौकशी केली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. यामुळे पोलिस देखील हादरले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.