छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची बातमी ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर कारचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी एक कारचालक हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने सुसाट वेगात जात होता. सेव्हन हिल उड्डाणपूल चढल्यावर पुलाच्या मधोमध त्याने अचानक ब्रेक दाबले. त्याच वेळेला अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा त्या कारच्या मागे होती. समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबले व ती जागेवर थांबली.
मागून असलेली कार रिक्षावर आदळली. त्यानंतर पाठोपाठ असलेली कार देखील पहिल्या कारवर आदळली. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला. अशातच शेवटच्या कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी मृत्यूबाबत कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले.

