छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
चोरट्यांचा भरवस्तीत धुमाकूळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यातच छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास सातारा परिसरात कुटुंबातील सदस्याला गळ्याला चाकू लावून घरातील दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. घटनेत चोरटे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर-यात कैद झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसांत वाळूज, पंढरपूर भागात घडलेल्या घटना ताज्या असताना पोलिसांना थेट आव्हान देत दरोडेखोरांनी शहरातील सातारा परिसरात धुमाकूळ घातला. घरात घुसून कुटुंबियांच्या गळ्यावर चाकू ठेवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
भर पावसात धुमाकूळ
दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू असताना ६ दरोडेखोर मंकी कॅप घालून आले. हातात कोयता, चाकू, तलवार, टॉमी, फावड्याचा दांडा, लोखंडी कटोनी शस्त्रे घेऊन त्यांनी धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी निलेश बागूल यांच्या बंगल्याचे चॅनल गेट तोडले. यानंतर घरात प्रवेश करत बाप-लेकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने लुटून पसार झाले.