लातूर : प्रतिनिधी
सकल वडार समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागच्या दहा दिवसांपासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसूनही त्याची शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २५ सप्टेंबर रोजी लातुरात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उपोषणकर्ते अॅड. तुकाराम काशिनाथ माने यांनी उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सकल वडार समाजाच्या कै. मारुती चव्हाण वडार समाज आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वडार समाजाच्या १०० विद्यार्थ्यांचे स्वतंत्र वसतिगृह सुरु करावे, रोहिणी आयोगाच्या केंद्र शासनाला केलेल्या शिफारशीनुसार वडार समाजाला ९ टक्के आरक्षण लागू करावे, जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी १९६१ च्या पुराव्याची अट रद्द करावी, नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करावी, वडार वस्ती सुधारण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, वडार समाजातील मजूर संस्थांना प्राधान्याने शासकीय कंत्राटाची कामे देण्याची तरतूद करावी, वडार समाजातील स्पर्धा परिसखार्थी, तसेच नवउद्योजकांना विशेष आर्थिक सहाय्याची तरतूद करावी, व्यावसायिक शिक्षणासाठीची राज्य शासनाने बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करावी, बी.आर. इदाते समितीच्या अहवालाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी अॅड. तुकाराम नये मागच्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत.
आपल्या समाजाच्या या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. २१ सप्टेंबर रोजी लातुरात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारे शासन या मागण्यांची व उपोषणाची दखल घेत नसल्याने बुधवारी लातुरात भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा बुधवारी सकाळी ११ वाजता टाऊन हॉल मैदानापासून सुरु होईल. टाऊन हॉल ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याचेही अॅड. तुकाराम माने यांनी सांगितले. याप्रसंगी सागर धोत्रे, नवनाथ ढेकरे, दीपक मुद्दे, सुरेश सूर्यवंशी, महेश वडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.