पुणे : प्रतिनिधी
बुलडाण्यातील राज्य पुरस्कारप्राप्त शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये आश्रमशाळेवरील शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावरून शेती, शिक्षणाबाबत या सरकारचे धोरण फक्त जाहिरातीपुरते आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, बुलडाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घटली. या घटनेनंतर बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचे नाव धनंजय नागरगोजे असे असून ते केज तालुक्यातील केळगाव येथील विनाअनुदानित आश्रमशाळेत गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान, या दोन्ही घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्या शेतक-याचे सरकारने कौतुक केले होते, त्या शेतक-याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. देवानंतर आपण आई-वडील आणि शिक्षकांना पुजतो. शेतकरी, शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत आहे की, एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हा सामाजिक विषय असून याला गंभीरपणे घेण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आज राज्यात शेतमालाला भाव नाही. तसेच विक्री होत नाही.
देश संविधानाने चालायला हवा
पुढे नवीन विशेष सुरक्षा कायद्यासंदर्भात विचारण्यात आले असता, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. १०० दिवसांत काय झालं हे सर्वांसमोर आहे. हा देश संविधानाने चालायला हवा. तो कुणाच्या भीतीने चालणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम हे सरकार करत आहे. संविधानाच्या चौकटीत काम झाले पाहिजे.