लातूर : प्रतिनिधी
सराफाकडील सोन्याची बॅग लुटण्यासाठी जुने गुळ मार्केट भागातील पार्किंगच्या ठिकाणी दबा धरुन असलेल्या चौघांना धारदार विळा, तलवार, लोखंडी बतईसह स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून अटक केलेल्यात दोघेजण नाशिक तर दोघेजण लातूर येथील आहेत.
लातूरच्या जुने गुळ मार्केट परिसरात एका सराफाची सोन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेले चौघेजण संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकास मिळाली. त्यानूसार संशय येताच पोलिसांनी चौघांना हत्यारासह अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष अशोक पेटकर, निलेश उर्फ भारत उर्फ नाना बापू क्षीरसागर वय २५, रा. दोघेही आम्रपालीनगर कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक, ज्ञानेश्वर शरद पोतदार रा. खोरी गल्ली लातूर व अक्षय लक्ष्मण महामुनी रा. ५ नंबर चौक, पंचवटीनगर, लातूर यांचा समावेश आहे.
काही सराफा व्यापारी सकाळी आपले वाहन पार्किंग मध्ये लावून सोन्याच्या दागिन्याची बॅग दुकानात घेऊन येतात व परत संध्याकाळी ती बॅग घरी घेऊन जातात हीच संधी साधून, अंधाराचा फायदा घेऊन सराफा व्यापा-यांची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याचा कट करुन त्यासाठी लातूर येथील दोघांनी चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या ओळखीच्या नाशिक येथील आणखीन दोघांना बोलावून घेऊन तीन-चार दिवसापासून पार्किंग परिसराची रेकी करून आज रात्री एका सराफा व्यापारी सोन्याच्या दागिन्याची बॅग घरी घेऊन जात असताना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून बॅग लुटणार होतो असे सांगून ज्ञानेश्वर पोतदार च अशोक महामुनी यांना देणे झाल्यानेच ते कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचनेतून, अडचणीमुळे पैसे मिळवण्यासाठी सदरचा प्रकार केल्याचे कबूल केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार सुधीर कोळसुरे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.