पुणे : गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तो पळून गेला. याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.
पोलिस शिपाई निखील अरविंद पासलकर आणि पोपट काळुसिंग खाडे असे निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबणाचे आदेश काढले आहेत. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानूसार आकुर्डी येथे रहाणा-या मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इंन्टा खाते उघडून धमकी दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्यावर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी रात्री छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. नाईट राऊंडचे पोलीस निरीक्षक खोमणे यांनी दोन पोलीस कर्मचा-यांना रुग्णालयात सोडून त्यांना योग्य ती काळजी घेत तपासणीसाठी आरोपीला नेण्यास सांगितले होते. दरम्यान दोन्ही कर्मचा-यांची नजर चुकवून आरोपी पळून गेला.