रक्ताचे नमुने बदलण्याची चुकवावी लागणार मोठी किंमत
पुणे : प्रतिनिधी
पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणा-या दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मोठी कारवाई केली. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ससूनच्या दोन्ही डॉक्टरांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला होता. दारुच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात आरोपी बड्या बापाचा पोरगा होता. त्यामुळे ससून रुग्णालयात डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणात मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आले होते. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यावर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. आता त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाई केली.
आरोपी हा बड्या बापाचा लेक असल्यामुळे पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. अल्पवयीन चालकाऐवजी त्याच्या आईचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील या दोन डॉक्टरांनी घेतले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर या दोन्ही डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या दोन डॉक्टरांसह एकूण दहा जणांना या अपघात प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता या दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द केला आहे. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.