पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एका वाहनांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या रकमेचा संबंध शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांशी जोडला जात आहे. दरम्यान, संजय राऊतांचे आरोप शहाजीबापू पाटील यांनी फेटाळत, खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडलेल्या पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नाही असे म्हणत राऊतांवरच निशाणा साधला आहे.
दरम्यान, काल पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोख रक्कम जप्त केली. ज्या वाहनातून जप्त करण्यात आली, त्या वाहनमालकाचे नाव अमोल नलावडे आहे.पण ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.
राऊतांचे सर्व आरोपाचे खंडन करत शहाजीबापू पाटील महणाले, राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यापासून संजय राऊतांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात आहे. असा पलटवार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.