बंगळुरू : आयपीएलच्या ५८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार होता. परंतु पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र खेळ होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट होताच सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
आयपीएलच्या १८ व्या मोसमातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली. दोन्ही संघाला एक-एक गुण दिला गेला.शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु त्याआधी ७ वाजता जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुस-या बाजूला पावसाची बॅटिंग सुरु होती. काही वेळ पाऊस थांबल्याने ग्राउंड स्टाफने खेळपट्टी कोरडी करण्यासाठी फार मेहनत घेतली. मात्र पावसाने पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे सामना रद्द करावा लागला.