22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवसावंत पुण्याचे की धाराशिवचे पालकमंत्री हे कळालेच नाही

सावंत पुण्याचे की धाराशिवचे पालकमंत्री हे कळालेच नाही

कार्यकर्त्याची पुण्यात भेट सर्वसामान्य वा-यावर, मतदार संघात चर्चेला उधान

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अनेकांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. मात्र तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली तेंव्हापासून या जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक वास्तव्य हे त्यांचे पुण्यातच असायचे. त्यामुळे ते नेमके पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे की, पुण्याचे होते. हे पालकमंत्री पदाचा कार्यकाळ संपला तरी धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना कळालेच नाही. अशी चर्चा आता जिल्हाभरात रंगू लागली आहे.

२०१९ मध्ये तानाजी सावंत यांनी एकसंघ शिवसेना असताना भूम-परंडा-वाशी मतदार संघातून महायुतीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी या मतदार संघात शिवसेनेची मोठी ताकद होती. त्यामुळे त्यांचा ३२ हजार ९०२ मतांनी विजय मिळाला. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेची विभागणी झाली. त्यात या मतदार संघातही मोठी विभागणी झाली आहे. त्यामध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे ठाकरे सेनेसोबत राहिले तर सावंत हे शिंदे गटासोबत गेले. या दोघांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शिवेसेनेत विभागणी झाली. या विभागणीनंतर भूम, परंडा, वाशी या तीनही तालुक्यात महाविकास आघाडी म्हणून एकेकाळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे हे विरोधक असलेले एकत्र आले. त्याचा फायदा म्हणून बाजार समिती, सोसायटी निवडणूकीत तानाजी सावंत यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे.आता २०२४ ची विधानसभा निवडणूक याच मतदार संघातून तानाजी सावंत लढत आहेत. मात्र २०१९ च्या निवडणूकीत सावंत यांना सहज विजय मिळाला तो आता कठीण होवून बसला आहे. या मतदार संघात २०१९ ला आमदारकी मिळवत पुढे सावंत यांना मंत्री पद मिळाले. एवढेच नव्हे तर त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पदही मिळाले. मात्र पालकमंत्री पदाच्या काळात त्यांनी हजारो कोटींचा निधी आणला असे सांगत मते मागत आहेत. मात्र याच मतदारसंघातील नागरिकांना किरकोळ कामासाठी पालकमंत्री जिल्ह्यात हजर नसल्यामुळे पुणे गाठावे लागत होते. शिवाय पालकमंत्री दोन दोन महिने जिल्ह्यात फिरकत नसल्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वचक नव्हता. त्यातच सर्वत्र प्रशासकीयराज असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची साधी कामे होताना मोठ्या अडचणी आल्या.

धाराशिव जिल्ह्यातील ही परिस्थिती असताना याचे जणू काही पालकमंत्री यांना देणे घेणे नव्हते अशीच स्थिती दिसून आली. तशी जिल्हाभरात त्यांच्याबाबत जोरदार चर्चा असून त्यात त्यांच्या मतदार संघातही तशीच ओरड आहे. त्यामुळे सावंत यांना मतदार पुन्हा कौल देणार का? याकडे संपुर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून त्यांचे जिल्ह्यातील दौरे हे ठराविक झाले होते. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर या व्यतिरिक्त क्वचित काहीच दौरे जिल्ह्यात त्यांचे होत होते. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी तसेच त्यांच्या जवळचे कार्यकर्ते यांना त्यांच्याकडील कामानिमित्त पुणे गाठावे लागत होते. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी पुण्यासारख्या ठिकाणी जाणे म्हणजे त्यांची देनंदिन कामे रेंगाळून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे जैसे थे राहत होती. यामुळे नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन काम न करता रिकाम्या हाताने निघून जावे लागत होते, अशा अनेकवेळा घटना घडल्या आहेत. शिवाय पालकमंत्री हे जिल्ह्यात नसल्यामुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनाही कोणाची भीती राहिली नव्हती. जिल्ह्यातील ही परिस्थिती पालकमंत्री म्हणून त्यांना कधी कळलीच नाही त्यांचा दौरा कात्रजपासून सुरू व्हायचा धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर सोनारी येथील त्यांच्या कारखाना स्थळ, त्यानंतर मतदार संघातील एक दोन ठिकाणी भेटी, तसेच धाराशिव येथील प्रशासकीय आढावा बैठक, त्यानंतर तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन त्यानंतर सोलापूर मार्गे पुणे असाच त्यांचा पालकमंत्री कार्यकाळातील दौरा राहिला आहे. पालकमंत्री कार्यकाळात त्यांनी परंडा मतदार संघ वगळता इतर मतदारसंघात किती दौरे झाले हा तर संशोधनाचा विषय आहे. केवळ धाराशिव येथे जिल्हा प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे ते या ठिकाणी येत असावेत अन्यथा ही कार्यालय मतदारसंघात असती तर त्यांनी मतदारसंघ वगळता कुठेही जाणे पसंद केले नसते, अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री हे केवळ स्वत:च्या मतदारसंघाचेच होते की काय जिल्ह्यातील इतर मतदारसंघ किंवा तालुके हे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकक्षेत बसत होते की नाही हा ही जिल्हाभरातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.

एकीकडे राज्याच्या राजकीय पातळीवर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे मोठमोठ्या गप्पा मारतात एवढे आमदार निवडूण आणण्याची आश्वासने पक्षश्रेष्ठीकडे सांगतात. मात्र केवळ धाराशिव जिल्ह्यातील त्यांचा मतदार संघ सोडला तर त्यांनी इतर मतदार संघात कीती दौरे केले यावरुन दिसून येते. इतर उमेदवारांना विजयी करण्यासाठीचे तर सोडाच. स्वत:चा मतदार संघ सोडला तर ते इतरांसाठी कसलीही जबाबदारी घेताना दिसत नाहीत केवळ मी व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळाली तरच ती त्यांची जबाबदारी असते. हे आजपर्यंतचे त्यांचे चित्र आहे, असे त्यांच्याच पक्षाचे जिल्ह्यातील इतर मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते दबक्या आवाजात सांगतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR