नवी दिल्ली : विनायक कुलकर्णी
दिल्लीतील साहित्य संमेलनातून परतीच्या वाटेवर निघालेल्या साहित्यिक, साहित्य रसिकांचा फिरत्या चाकांवरील मराठी साहित्ययात्री संमेलनात मराठीचा जागर सुरूच आहे. पोवाडे, अभंग, कथाकथन, कविता वाचन असे उपक्रम उत्साहाने सुरू आहेत.
पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे या विशेष रेल्वेत हे साहित्ययात्री संमेलन सुरू असून ही विशेष रेल्वे पुण्यात पोहोचल्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनाचा समारोप झाल्यानंतर दिल्ली येथून रात्री विशेष रेल्वे पुण्याकडे निघाल्यानंतर साहित्ययात्री संमेलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. संमेलनाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे आहेत, तर वैभव वाघ हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. सोमवारची सकाळ अभंग, भजन, कीर्तनासह, पोवाड्याच्या सादरीकरणाने भक्ती आणि वीररसात चिंब झाली. यावेळी भक्तीगीते सादर करण्यात आली. विविध डब्यांमध्ये सुरू असलेले कविता, कथा वाचन तसेच विविध कलांच्या सादरीकरणातून रसिकांना विविध साहित्य, कलाकृतींची आनंद मिळत आहे. ढोल-ताशा पथकातील वादक तसेच अनेक हौशी कलाकारही मोठ्या उत्साहाने कला सादर करत आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाचा आनंददायी प्रवास सुरूच आहे.
नाशिक येथील वारकरी भाविकांनी अभंग, हरिपाठ आणि भजन सादर केले. यात राजेंद्र सपकाळ, बाळासाहेब फराटे, सुखदेव सांगळे, लक्ष्मी घुले यांचा सहभाग होता. सिंहगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादकांनीही कला सादर केली. सोलापूरचे कवी सुरेशकुमार लोंढे, बेळगावचे कवी महादेव खोत, कोल्हापूरचे कवी मकरंद वागणेकर यांनी कवितांचे वाचन केले.
प्रवाशांच्या काळजीसाठी स्वयंसेवक
रेल्वेत प्रवाशांची काळजी घेणा-या स्वयंसेवकांनी सामुहिक नृत्य-वादन करून सर्वांचे मनोरंजन केले. आटपाडीचे ढोलकी वादक सिद्धनाथ जावीर व माळशिरसचे संवादिनीवादक राजवर्धन वाघमारे यांच्या साथीने प्रवाशांनी भक्तीरचना सादर केल्या.