लातूर : प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा संकुल येथे लातूर जिल्हा कृषि विभागाने सीताफळ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात बोटावर मोजण्या इतके शेतकरी सहभागी झाले होते. त्यातही जिल्हा अधिक्षक कृषि विभागाचे ढिसाळ नियोजनामुळे सकाळी ११ वाजता होणारे सीताफळ महोत्सवाचे उद्घाटन दुपारी दोन वाजण्याल्यानंतर झाले. उद्घाटनाची वाट बघून कांही शेतकरी कंटाळून निघून गेले. त्यामुळे सिताफळ महोत्सवाची क्रेझ भरदुपारीच ओसरल्याचे चित्र दिसून आले.
लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर लातूर जिल्हा कृषि विभागाच्यावतीने सीताफळ महोत्सव मंगळवारी पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातील दहा तालुक्यातील सीताफळ उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता या सिताफळ महोत्सवाचे उद्घाटन होणार म्हणून बरेचसे शेतकरी उपस्थित होते. सिताफळ उद्घाटनाला उशिर होत असल्याने शेतकरी आपल्या जवळ उपलब्ध असलेले सिताफळ, पेरू, पपई, चिंचा, अंजिर, मधाची विक्री सुरू केली. बघता-बघता दोन वाजले तरी सिताफळ महोत्सवाचे उद्घाटन रेंगाळलेच होते. कांही शेतकरी कंटाळून मी गावाकडे जातो, असे सांगून निघून गेले.