३० टक्के बोर्डाचा अभ्यासक्रम राहणार : भुसे
शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य
मुंबई : प्रतिनिधी
२०२५-२६ या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार असून राज्यातील सीबीएसई पॅटर्नचा विचार केल्यास ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती आहे.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य महामंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आपल्या मुलांना शिक्षण देणा-या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, शासनाने तयारी सुरू केली आहे. सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात यंदाच्या वर्षांपासून लागू करण्यात येत असून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ७०% आणि ३०% फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. अर्थात ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती आहे.
सीबीएसई अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३०% मध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाईल. शासनाच्या धोरणानुसार यावर्षी पहिल्या इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल, त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाईल. त्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे भुसे म्हणाले.
सीबीएसई पॅटर्नला
थेट सुळेंचा विरोध
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सीबीएसई पॅटर्नला थेट विरोध केला असून राज्यातील एसएससी बोर्ड बंद करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात त्यांनी दादा भुसे यांना पत्रही दिले आहे. राज्यातील एसएससी बोर्ड बंद करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.