नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचचली आहेत. त्यामुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्याचा परिणाम जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती गावांमध्येही दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील लोकांनी बंकरची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सीमेवर युद्धाची तयारी सुरु झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कोणत्याही कारवाई दरम्यान, आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नसल्याचे गावक-यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगामधील हल्ल्यानंतर काश्मीर खो-यात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान, सीमेजवळ राहणा-या लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई करण्यात येत आहे. सीमेवर गोळीबार असो किंवा युद्ध, या काळात काश्मिरी लोक आपले घर सोडून सुरक्षित बंकरमध्ये राहतात.
पूंछ जिल्ह्यातील सीमेजवळ राहणा-या गावांमध्ये सध्या गावकरी त्यांचे बंकर स्वच्छ करण्यात आणि आवश्यक वस्तू गोळा करण्यात व्यस्त आहेत. हे बंकर भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांनी बांधले गेले आहेत. या बंकरमुळे त्यांना गोळीबाराच्या वेळी गाव सोडून पळून जावे लागणार नाही आणि आम्ही स्वत:च्या गावात सुरक्षितपणे राहू शकू असे गावकरी सांगत आहेत.
आधी तर आम्ही भाकित करु शकत नव्हतो की सीमेवर गोळीबार केव्हा होईल. इथे कधीही काहीही होऊ शकतं. म्हणून, घरगुती बंकर बहुतेक तयार मिळतात. पण आपल्याला मोठे बंकर तयार करावे लागतात. पहलगाममध्ये जे झालं त्याला उत्तर नाही दिलं ती शरमेची बाब ठरेल. आम्ही सीमेवर राहतो त्यामुळे जे काही होईल त्याचा परिणाम आमच्यावर होणार आहे. आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नाही. आता जे व्हायचे आहे ते आरपार होऊ द्या. कारण त्यांनी जे केलं आहे त्यांच्या दु:खासमोर आमचे दु:ख काहीच नाही. आम्हाला त्यांना अजिबात असे वाटू द्यायचे नाही की सीमावर्ती भागातील लोक सुरक्षित असतील की नाही. म्हणून, आम्ही हे बंकर तयार करत आहोत, असे एका महिलेने सांगितले.
भारत सरकारने बांधलेले हे बंकर केवळ खूप मजबूत नाहीत तर बुलेटप्रूफ देखील आहेत. हे जमिनीपासून १० फूट खाली बांधले गेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळीबाराची किंवा हल्ल्याची भीती नाही. कारगिल युद्धादरम्यान आम्हाला स्थलांतर करावे लागले होते, पण आता बंकरमुळे आम्ही आमच्या गावात सुरक्षित आहोत, असेही गावक-यांनी म्हटलं. महिलांकडून बंकरमध्ये गॅस सिलिंडर, रेशन, ब्लँकेट आणि बेडिंग इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तंची जमवाजमव केली जात आहे.