33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसुनिता विल्यम्सचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग खडतर ?

सुनिता विल्यम्सचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग खडतर ?

सॅन्फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. दरम्यान, सर्वजण त्यांच्या पृथ्वीवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, स्पेसएक्सने ४ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याची योजना आखली होती. हा क्रू पाठवल्यानंतरच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतील. हे क्रू-१० बुधवारी पाठवले जाणार होते, परंतु रॉकेटच्या लाँचपॅडमध्ये शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्येमुळे, स्पेसएक्सने क्रू-१० चे प्रक्षेपण रद्द केले.

या चार अंतराळवीरांना सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले जाणार होते, त्यानंतरच ते दोघे पृथ्वीवर परत येऊ शकणार आहेत. गेल्या ९ महिन्यांपासून ते दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अवकाशात अडकले आहे. ८ दिवसांच्या या मोहिमेवर ते अंतराळात गेले होते पण बोइंगच्या स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे दोघेही अद्याप अवकाशात अडकले आहेत.

क्रू-१० च्या प्रक्षेपणाच्या वेळी अधिका-यांनी हे मिशन रद्द केल्याची घोषणा केली. मात्र आता हे मिशन पुढील कोणत्या तारखेला पुन्हा लाँच होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवरून परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. दरम्यान, एकीकडे हे लोक १९-२० मार्च २०२५ रोजी परततील अशी अपेक्षा असताना आता त्यांना परत आणण्याची नासाची आणखी एक योजना फसल्यामुळे परतीचा कालावधी आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.

स्पेस एक्स रॉकेट सकाळी ७:४८ वाजता केप कॅनाव्हरलमधील केनेडी स्पेस सेंटरमधून क्रू-१० पाठवण्यासाठी लाँच होणार होते, ज्यामध्ये युनायटेड स्टेट्समधील दोन अंतराळवीर, एक जपान आणि एक रशियाचा चार जणांचा क्रू होता. क्रू-१० मिशनचा मूळ हेतू नियमित अंतराळवीर रोटेशनचा होता. नासाने सुरुवातीला २६ मार्च रोजी क्रू-१० चे प्रक्षेपण नियोजित केले होते, परंतु स्पेसएक्स कॅप्सूलची अदलाबदल करून मोहिमेला वेग आला. नवीन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतील. क्रू -१० येईपर्यंत विल्मोर आणि विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रहावे लागेल जेणेकरून ते स्टेशनची देखभाल करू शकतील, असे नासातर्फे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR