नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणास्तव ४०० ड्रोन्स खरेदीचा करार रद्द केला आहे. या ड्रोनमध्ये चिनी पार्टस् बसविण्यात आल्याने सायबर सुरक्षेला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे हा करार रद्द करण्यात आला आहे. हा करार २३० कोटी रुपयांचा होता. त्यात २०० मध्यम उंचीचे, १०० जड वजनाचे आणि १०० हलक्या वजनाच्या लॉजिस्टिक ड्रोनचा समावेश होता.
हे सर्व ड्रोन्स भारतात बनवले, पण त्यात चिनी पार्टस् लावल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने करार रद्द केला आहे. या ड्रोन्सच्या वापरामुळे सायबर सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांनी चिनी घटकांसह ‘मेड इन इंडिया’ ड्रोनच्या सायबर-सुरक्षा असुरक्षिततेबद्दल इशारा दिला आहे. सर्वात मोठा धोका म्हणजे डेटा लीक होणे, ज्यामध्ये संवेदनशील लष्करी ऑपरेशन्सची माहिती देखील समाविष्ट आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये एम्बेड केलेल्या बॅकडोअर सुरक्षा वैशिष्ट्यांना बायपास करण्याची यंत्रणा, विशेषत: कम्युनिकेशन मॉड्यूल कॅमेरे आणि नियंत्रण प्रणाली, मोहिमांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी किंवा ऑपरेशनच्या मध्यभागी ड्रोनवर नियंत्रण मिळविण्यासाठी वापरली जाऊ शकते.
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्सने संवेदनशील आणि गंभीर सुरक्षा उपकरणांमध्ये चीनी घटकांच्या वापराविरूद्ध वारंवार सूचना जारी केल्या आहेत. अशा प्रणालींमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर चीनचे नसावेत, असे निर्देशांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे.