उदगीर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आणि सामान्य घरातील नरेंद्र मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारताचे संविधान राहणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा झाला, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि ज्यांच्या पुढाकाराने हे बुद्धविहार उभे राहिले ते राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देशाचे संविधान कोणीही बदलणार नाही, असे म्हणत जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत भारताचे संविधान राहणार असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नारीशक्तीचा विकास महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. त्या म्हणाल्या की, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा महिलांनी उपयोग घेऊन स्वत:चा विकास करावा. महिलांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. नारीशक्तीचा विकास देशवासियांसाठी महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही देशाच्या विकासाचा मापदंड हा महिलांचा विकास असला पाहिजे.
गृहमंत्री फडणवीस यांनी केले मंत्री संजय बनसोडे यांचे कौतुक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विश्वशांती बुद्ध विहारासाठी थायलंड येथून भगवान बुद्धांची मूर्ती आणण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की बाबासाहेबांनी समतेचा, बंधुतेचा धम्म या देशाला दिला. जगातील प्रगत देशांमध्ये सर्वाधिक भगवान बुद्धांना मानणारे अनुयायी दिसतात. भगवान बुद्धांचा विचार साऊथ आशियातील सर्वाधिक देशांनी स्वीकारला आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा समता आणि बंधुतेचा विचार संविधानात समाविष्ट केला आहे. हे संविधान सूर्य आणि चंद्र असेपर्यंत कोणीही बदलू शकणार नाही.
‘लखपती दीदी योजने’चा शुभारंभ
याच कार्यक्रमात राज्य सरकारच्या लेक लाडकी, लाडकी बहीण आणि केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘आमची बहीण आहे लाडकी, विरोधकांच्या पोटात भरली धडकी’. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून दिले तर १५०० रुपये महिना वाढवून दर महिन्याला ३००० रुपये करण्याचे आश्वासन आठवलेंनी दिले..