24.7 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeनांदेडसूर्यकांत पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी

सूर्यकांत पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी

नांदेडमधून पहिला धक्का, कॉंग्रेसमध्ये जाणार?

नांदेड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर सध्या मंथन सुरू असतानाच माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत प्राथमिक सदस्य आणि संयोजकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. गेल्या १० वर्षांत मला खूप काही शिकायला मिळाले. मी पक्षाचा आभारी आहे असे सांगत त्यांनी राजीनामा दिला.

सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी थेट पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सूर्यकांता पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख हदगाव, हिमायतनगर मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्या प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सूर्यकांता पाटील यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. हदगाव मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची भाजपकडे इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना संधी काही मिळाली नाही. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेत घेतल्याने त्या नाराज होत्या. दिल्ली येथील शेतकरी आंदोलन, अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश या विषयी त्यांनी परखड मत व्यक्त करत भाजपाला घरचा आहेर दिला होता. त्यातच त्या नाराज असल्याने वेगळी वाट धरतील, असे बोलले जात होते. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

१० वर्षांत खूप काही शिकायला मिळाले
मागील १० वर्षात पक्षात राहून खूप काही शिकायला मिळाले. तालुक्यात बूथ कमिटीपर्यंत काम केले. कोणतीही कटुता मनात नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात त्या काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR