35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूरसोयाबीन खरेदीला एक महिन्याची मुदत वाढ द्यावी

सोयाबीन खरेदीला एक महिन्याची मुदत वाढ द्यावी

लातूर : प्रतिनिधी
सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदीची मुदत संपल्यानंतर खुल्या बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल १ हजार रुपयांपर्यंत खाली गेल्यामुळे, शेतकरीवर्ग प्रचंड अडचणीत आणि तणावाखाली आला आहे. या परिस्थितीत शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.
या संदर्भाने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, यावर्षी राज्यात ५० ते ६० लाख मॅट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन झाले असून सोयाबीन हमीभाव केंद्रावर आत्तापर्यंत फक्त १० ते १२ लाख मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी झाली आहे. शासनाने ठरवून दिलेला सोयाबीन खरेदीचा हमीभाव ४८९२ रुपये असून आज हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदी थांबल्यानंतर खुल्या बाजारात ३९०० रुपयांच्या खाली सोयाबीन विकले जात आहे.
शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यापूर्वीच शेतक-यांना ऑनलाइन पद्धतीने आपल्याकडील सोयाबीनची नोंदणी करण्यास सांगितले होत. प्रत्यक्षात उशिराने सुरु झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर अत्यंत धीम्या गतीने खरेदी सुरु राहिल. मध्यंतरी बारदाना नाही म्हणून काही काळ ही खरेदी बंद ठेवण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेले सर्व सोयाबीन खरेदी केले जाईल, असे सांगितले. नंतर ही मुदत ६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. या कालावधीत फक्त १० ते १२ लाख मेट्रिक टन  एवढ्याच सोयाबीनची खरेदी झाली आहे.
सरकारचे आयात धोरण आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्ग अगोदरच अडचणीत आला असून या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ताबडतोब पावले उचलणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी शेतक-यांच्या वतीने मुख्यमंत्री व पनानमंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR