मुंबई : मुळात छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे हे संघ किंवा भाजपाच्या विचारधारेची प्रतीके कधीच नव्हती. आता ते सोयीनुसार ‘जय शिवाजी’, ‘जय संभाजी’ म्हणत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना शिवरायांपेक्षा औरंग्या अधिक महत्त्वाचा वाटतो, हे आता स्पष्ट झाले. शिवरायांचे राज्य धर्माचे, पण सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारे होते. हा विचार भाजपाला आधीही मान्य नव्हता आणि आताही मान्य नाही. या लोकांना (भाजपा) शिवाजीराजे आणि संभाजीराजांचे महत्त्व कमी करायचे आहे. त्यामुळे शिवाजीराजे तसेच संभाजीराजे ज्या खलनायकाविरुद्ध लढले आणि त्यांनी ज्याला महाराष्ट्रात गाडले, त्या खलनायक औरंगजेबालाच आधी कबरीसह संपवायचे. खलनायक संपला की, ‘नायक’ शिवाजीराजे तसेच संभाजीराजेही आपोआप संपतील ही यांची चाल आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.
कोकणात होळीच्या सणात नवहिंदुत्ववाद्यांनी दंगलीची ठिणगी टाकली. राज्याचे मंत्री धार्मिक द्वेष वाढेल अशी भाषणे देतात आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हात चोळत बसले आहेत. याला राज्य करणे म्हणत नाहीत. औरंगजेबाचे महिमामंडन महाराष्ट्रात कोणीच करणार नाही. येथे फक्त छत्रपती शिवरायांचाच जयजयकार होईल. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी आणि भाजपामधील नवहिंदुत्ववाद्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले आणि महाराष्ट्रातले वातावरण बिघडवले, असा आरोपही त्यांनी केला आहे.
गृहखात्याचे गुप्तचर झोपा काढत होते काय?
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगल उसळली. पोलिसांवर हल्ले झाले. नागपुरात जाळपोळीचा भडका उडाला. नागपूरला ३०० वर्षांचा इतिहास आहे. या ३०० वर्षांत कधी दंगल घडल्याची नोंद नाही. मग आताच भडका का उडाला? फडणवीस म्हणतात, हे दंगलखोर बाहेरचे होते. बाहेरचे दंगलखोर शहरात येऊन हैदोस घालीपर्यंत पोलिस काय करीत होते? गृहखात्याचे गुप्तचर झोपा काढीत होते काय? असे प्रश्न निर्माण होतात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.