सोलापूर : सोलापूर परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. मुलींना अश्लील बोलणे, जाता-येता द्विअर्थी बोलणे, गाडीवरून कट मारणे, असे प्रकार वाढले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन वर्षात तरुणी व महिलांवर एकूण ३१६ विनयभंग झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
दरम्यान, महिला व मुलींवरील विनयभंगाच्या ३१० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत, त्या ठिकाणांची माहिती घेत त्यानुसार गस्तीची आखणी करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात महिलांबाबत गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याकडेच तपास दिला जातो. सोलापूर शहरात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिस सतर्क राहिले तर निश्चितच गुन्हेगारीला आळा बसेल .
स्थानिक पोलिसांच्या दप्तरी नोंद होणाऱ्या महिला, तरुणी व मुलींच्या विनयभंगाच्या चढ्या आलेखामुळे घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती, असा प्रश्न पडत आहे. हीच भीती लक्षात घेत निर्जनस्थळ, अंधाऱ्या वाटा आणि रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ओळखीचे व नातेवाईकच अशा पीडित मुली, तरुणी आणि महिलांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्यासोबत अत्याचार करतात. यामुळे नराधमांच्या आमिषाला कोणी बळी पडू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपेक्षा शाळाबा रोडरोमिओंचा त्रास अधिक असून विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विद्यार्थिनी रस्त्याने जात असल्यास रोडरोमिओ वेगाने गाडी चालवून कट मारतात. अनेकदा हावभाव करणे, इशारे करण्याचे प्रकार शाळा-महाविद्यालयांच्या भर रस्त्यावर घडतात
सर्वच शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस परिसरात हा उपद्रव आहे.