मुंबई : प्रतिनिधी
मनोरंजनाच्या प्रवाहातला असाच एक अनोखा प्रयोग आज ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम ’ या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सायंकाळी ७.०० वाजल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तीन तासांच्या या महासंगीत सोहळ्यात ३३ कलाकारांची फौज दिसणार आहे.
अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात दिसणार आहेत. कलादिग्दर्शक तृप्ती ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणार दोन सेट उभारले गेले. ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा तीन तासांचा महासंगीत सोहळा शूट केला आहे. याविषयी सांगताना सचिन गोखले म्हणाले, माझ्यासाठी खरंच हे आव्हानात्मक होतं. स्टार प्रवाहने माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यासाठी आभार. तीन तासांचा हा महासंगीत सोहळा उभा करणं हे सोपं नव्हतं. या आव्हानाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘दोन मालिका ज्यांची स्वतंत्र कथानकं सुरु आहेत त्या एकत्र गुंफून त्याची एक गोष्ट बांधणं आणि त्यात तीन तासांचा भक्कम भाग बनवणं आणि ३३ कलाकार असणं हे आव्हानात्मक होतं. स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमने मिळून हे पार पाडलं आहे. रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंका नाही. जितकी मेहनत करतो तेवढा रसिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे असे नवनवे प्रयोग करताना फार आनंद होतो. मात्री खात्री आहे महासंगीत विशेष भाग उत्तम मनोरंजन करेल.’
महासंगीत सोहळ्यात प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता-सागर, थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील तेजस आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अर्थात जयदीप-गौरीचा देखिल खास परफॉर्मन्स असणार आहे.