मुंबई : नवी मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जर सुनावणीत सकारात्मक निर्णय झाला आणि न्यायलयाने निवडणूक घेण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला तर राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई, नवी मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिल्यास राज्यातील मुंबई, नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेणे शक्य आहे. राज्य आणि महापालिका निवडणूक यंत्रणा सुद्धा निवडणुका घेण्यास सज्ज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत प्रभाग रचनेतील संख्यात्मक बदल यावरील अक्षेपामुळे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात व तेथून सर्वोच्च न्यायालयात गेले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेची मुदत ९ मे २०२० रोजी संपुष्टात आली होती. मात्र कोविड कालावधी व इतर कारणांमुळे या महापालिकेची निवडणूक सुध्दा रखडली.
राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका मुदत संपल्यानंतर तीन-चार वर्षे उलटली तरी न्यायालयीन प्रक्रिया, आक्षेप, विविध कारणास्तव रखडल्या आहेत. मात्र आता राज्यातील राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांना निवडणूक घेण्याबाबत घाई लागून राहिली आहे. मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र २५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली.
त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. इच्छुकांची प्रतीक्षा वाढली आहे.
त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंगळवार हा न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खूप महत्त्वाचा दिवस आहे.