23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरहजारोंच्या शिवभक्तांच्या उपस्थितीत झुलला शिवबांचा पाळणा

हजारोंच्या शिवभक्तांच्या उपस्थितीत झुलला शिवबांचा पाळणा

लातूर : प्रतिनिधी
भगव्या पताका, विद्यूत रोषणाईचा झगमगाट, फटाक्यांचा कडकडाट, मराठमोळ्या पेहरावात भगवे फेटे बांधून आलेल्या माता-भगिणी  शिवरायांचा अखंड जयजकार अशा उत्साही वातावरणात लातुरकरांनी शनिवारी शिवजन्माचे स्वागत केले. मध्यरात्री जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे , वीरपत्नी मुद्रिका प्रकाश कांबळे व महिलांनी बाळ शिवबांचा पाळणा झुलवला अन् सारा परिसर पुन्हा शिवरायांच्या गगनभेदी जयकाराने निनादून गेला.
येथील सावर्जनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रथमच बाल शिवबाच्या पाळण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे व्यापक नियोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा मंच उभारण्यात आला होता. डॉ. निशीगंधा संतोष साळुंके यांचा  आम्ही जिजाऊंच्या लेकी हा शिवगितांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्री ८ वाजेपासूनच महिला, विद्यार्थींनी तसेच नागरीकांनी कार्यक्रमस्थळी येण्यास रांगा लावल्या होत्या. सारा चौक शिवप्रेमींनी गजबजला होता. समितीच्या वतीने सर्वांचेच भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात येत होते. दरम्यान रात्री ९ वाजता जिजाऊ वंदनेने डॉ. साळुंके व त्यांच्या संचाने कार्यक्रमास सुरुवात केली. वीर मावळ्यांची  शिवभक्त्ती शक्त्ती व युक्त्तीचे गुणगाण करणारी गीते अन पोवाडे सुरु झाले.
शाहीर साबळेच्या महाराष्ट्र गिताने, डफावरील थापेने, तुता-यांच्या निनादाने, गीतांबरोबर सादर होणा-या शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाने उपस्थितांना शिवभक्तीचे भरते आले अन अवघे वातावरण शिवमय  झाले.  रात्री पावनेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मंचावर आल्या अन त्यांचे तसेच वीर पत्नी मुद्रिका प्रकाश कांबळे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे तहसिलदार तांदळे  यांचे स्वागत करण्यात आले अन त्यानंतर पाळणा झाला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR