लातूर : प्रतिनिधी
हमालीच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माथाडी कामगारांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरु केला होता. दरम्यान, दि. २७ फेब्रुवारी रोजी बाजार समिती पदाधिकारी व माथाडी कामगारांची बैठक झाली. लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बाजार समितीने दिल्याने माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे आजपासून बाजार समितीतील व्यवहार पूर्वत सुरु होणार आहेत.
सध्या रब्बीतील शेतीमालाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे बाजार समितीत दररोज जवळपास २० हजार क्विंटलची आवक होत होती. त्यातून दिवसासाठी १५ कोटींची उलाढाल होत होती. दरम्यान माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप सुरु केला होता. त्यामुळे शेतक-यांची अडचण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने मंगळवारी दुपारी बाजार समिती संचालक आणि माथाडी कामगारांची बैठक बोलावली होती. बैठकीस सभापती जगदीश बावणे, संचालक शिवाजी कांबळे, सुधीर गोजमगुंडे, बालाप्रसाद बिदादा, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव शरद कसबे लखन साबळे भरत कांबळे रज्जाकभाई शेख आदी उपस्थित होते. बैठकीत हमालीच्या दरात वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेत असल्याचे सांगून बुधवारपासून कामावर सहभागी होणार असल्याचे सांगितले.
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे चार दिवसापासून बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतक-यांची अडचण झाली. ती सोडवण्यासाठी आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करुन निर्णय घेऊ, तोपर्यंत माथाडी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन केले. त्यास माथाडी कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे सभापती जगदीश बावणे म्हणाले. हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून आम्ही संप पुकारला होता. मंगळवारी बैठकीदरम्यान बाजार समितीने दर वाढीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी मागितला आहे. त्यानंतर दरवाढ करु, असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आजपासून कामावर येत आहोत, राज्य माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी सांगीतले.