रेणापूर : प्रतिनिधी
आकाशात ढगांची गर्दी, त्यात बोचरी थंडी वरून धुक्याची चादर या वातावरणामुळे ज्वारीवर पोंगअळी तर हरभरा पिकावर उंट अळीसह अन्य आळ्यांंचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे ही पिके धोक्यात आली आहेत, तसेच तुरीवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यातही घट झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.
रब्बीची पेरणी झाल्यानंतर पावसाअभावी रब्बीची पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच परवा अचानक अवकाळी पाऊस पडला त्यामुळे रब्बीच्या पिकांना कांहीअंशी का होईना जीवदान मिळाले. गेल्या आठवड्यात सततच ढगाळ वातावरण राहिले त्यामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात उंटअळी, हिरवी व काळी अशा अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या आळ्या हरभ-याचे शेंडे कुरतडत आहेत. कोवळी पाने खात आहेत. त्यामुळे हरभ-याचे पीक सध्या धोक्यात आले आहे. तसेच ज्वारीवरही मोठ्या प्रमाणात पोंग अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारीचे पीकही वाया जाण्याची शक्यता निमोण झाली आहे. फळपिकांवरही मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा स्थितीत रब्बी पीकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच करडईवर कांही ठिकाणी मावा पडल्याने करडईचेही पीक धोक्यात आले आहे.