भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने भारत आणि पाकिस्तानमधील महासामन्याची वाट बघत आहेत. प्रत्येकाच्या तोंडी भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा आहे. बांगलादेशविरुद्ध पहिला सामना जिंकला पण झगडावे लागले कारण चुका झाल्या. नेमक्या त्याच चुका पाकिस्तानसोबत खेळताना करून चालणार नाहीत. फिल्डिंगमध्ये सुधारणा करावीच लागेल आणि प्रमुख फलंदाजांना डावाच्या सुरुवातीला मोठे फटके हवेत मारायचा मोह टाळावा लागेल. बांगलादेशविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने सोडलेल्या कॅचमुळे अक्षर पटेलची हॅट्ट्रिक हुकली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी टॉस जिंकणे खूप महत्त्वाचे असेल. दुबईमध्ये झालेल्या वनडे सामन्यांत टॉस जिंकल्यानंतर, जो संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, तो अर्धा सामना जिंकतो. म्हणूनच या मैदानावर टॉसला इतके महत्त्व दिले जाते. आतापर्यंत ५९वनडे सामने खेळले गेले आहेत आणि या काळात लक्ष्याचा पाठलाग करणा-या संघाने ३५ सामने जिंकले आहेत.
त्याच वेळी, प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त २२ सामने जिंकू शकला आहे. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी २१९ धावा आहेत. बहुतेक कर्णधार या खेळपट्टीवर टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतात, कारण दुस-या डावात येथे फलंदाजी करणे सोपे असते.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास पाहता भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या पाच सामन्यांत पाकिस्तानने तीनदा विजय मिळवला आहे २००४ मध्ये इंग्लंडमध्ये तीन विकेटनी, २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ५४ धावांनी आणि २०१७ ला इंग्लंडमध्ये ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला १८० धावांचा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता मात्र भारताने पाकिस्तानचा २०१३ च्या स्पर्धेत आठ विकेटनी आणि २०१७ मध्ये प्राथमिक स्पर्धेत १२४ धावांनी पराभव केला. तसे आयसीसी चॅम्पियनचा विचार करता भारताने सहा तर पाकिस्तानने फक्त तीनच जेतेपदे मिळवली आहेत.
५० षटकांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर भारताने पाकिस्तानला एकही विजय मिळवू दिलेला नाही. स्पर्धेत झालेल्या आठही सामन्यांत पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचा कित्ता गिरवला जाईल अशी सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. हा सामना पाकिस्तानसाठी ‘करो वा मरो’ स्थितीचा आहे. न्यूझिलंडने पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात हरवले असल्याने यजमान पाकिस्तानला भारताविरुद्धचा सामना अटीतटीचा असेल. अंतिम फेरीत प्रवेशासाठी पाकिस्तानला भारत आणि बांगलादेशविरुद्ध लढायचे आहे. हे दोन्ही सामने पाकिस्तानला जिंकणे गरजेचे आहे. एका गटात चार संघ असल्याने प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागतील त्यामुळे तीनपैकी दोन विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. दोन पराभव झाल्यास उरलेल्या संघांच्या जय-पराजयावर अंतिम फेरीचा निकाल लागेल आणि निव्वळ धावगतीवर अंतिम सामन्यासाठी संघ पात्र होतील.
मैदानाबाहेरून
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर