नालगोंडा : वृत्तसंस्था
तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार वेमुला वीरेशम यांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फसवणूक करणा-यांनी त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओ कॉल केला आणि त्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. नकरेकल येथील आमदाराला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर ही भयंकर घटना घडली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदाराला आलेल्या व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रीनवर एक महिला दिसत होती. यानंतर फसवणूक करणा-यांनी व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला आणि आमदाराला धमकी दिली की जर त्याने पैसे दिले नाहीत तर हा व्हिडीओ त्याच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवला जाईल. हे प्रकरण सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. ज्यामध्ये गुन्हेगार व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना अडकवतात आणि ब्लॅकमेल करतात.
या अनपेक्षित घटनेनंतर आमदार वीरेशम यांनी क्षणाचाही विलंब न करता फोन डिस्कनेक्ट केला आणि तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे व्हिडीओ कॉल मध्य प्रदेशातून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
पोलिस अधिका-यांचं म्हणणं आहे की, सायबर गुन्हेगारांची ही एक नवीन पद्धत आहे. ज्यामध्ये ते अचानक सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपद्वारे एखाद्याला व्हिडीओ कॉल करतात आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू करतात. ब-याच प्रकरणांमध्ये लोक भीतीपोटी पैसे देतात. पण आमदार वीरेशराम यांनी सतर्कता दाखवली आणि तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.