शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोळ परिसरात दि.२३ जून रोजी झालेल्या ढगफुटीमुळे नुकतीच पेरणी झालेल्या खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतजमीनसुद्धा खरडून वाहून गेली असल्यामुळे शेतक-याावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतक-यांंना हेक्टरी ५० हजाराची तात्काळ मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन साकोळ स्वाभीमानीच्या वतीने तहसीलदार गोंिवदराव पेद्देवाड यांना देण्यात आले आहे.
साकोळ शिवारात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरातील कोवळी पिकासह जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.अगोदरच खते व बी बियाणे यांचे भाव गगनाला भिडले असता शेतक-यावर दुबार पेरणीची वेळ आल्याने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये देऊन अडचणीत सापडलेल्या शेतक-यांंना जीवदान द्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे. या ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या कोवळ्या पिकांसह खरडून गेलेल्या शेतजमीनीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अन्यथा शेतकरी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष माणिक गायकवाड, साकोळचे अजीम मुल्ला हे उपस्थित होते. या निवेदनावर विद्यानंद लुल्ले, सुभाष लुल्ले, रावसाहेब लुल्ले, दिलीप धुमाळे, शिवाजी डोंगरे, सोमेश्वर डोंगरे, शरद रामशेटे, सिद्धेश्वर पाटील, मल्लिकार्जुन भुरे, ईश्वर धुमाळे, परमेश्वर पाटील, नागोराव स्वामी, शिवराज भुरे, विठ्ठल भुरे, जगदीश साकोळे, काशिनाथ कडेकर, सोमनाथ सोनटक्के बसवराज भुरे यांसह अनेक शेतक-याच्या स्वाक्ष-या आहेत.