लखनौ स्पर्धेतून बाहेर, प्लेऑफसाठी मुंबई-दिल्लीत लढत
हैदराबाद : वृत्तसंस्था
आयपीएलच्या ६१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सवर ६ विकेट्सने विजय मिळवला. लखनौने हैदराबादला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे आव्हान १० बॉलआधी आणि ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. हैदराबादने १८.२ ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केले. हैदराबादचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. हैदराबादने हा विजय मिळवत लखनौला या स्पर्धेतून बाहेर केले. लखनौ या स्पर्धेतून बाहेर पडणारी पाचवी टीम ठरली. त्यामुळे आता प्लेऑफच्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
ओपनर अभिषेक शर्माने हैदराबादच्या विजयात सर्वाधिक धावांचे योगदान दिले. अभिषेकने २० बॉलमध्ये ६ सिक्स आणि ४ फोरसह ५९ रन्स केल्या. अथर्व तायडेने १३, ईशान किशनने २८ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले. हेनरिक क्लासेनने २८ बॉलमध्ये ४७ रन्स केल्या. कामिंदू मेंडीस 32 रन्स करुन रिटायर्ड हर्ट झाला तर अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी नाबाद ५-५ धावा करत हैदराबादला विजयापर्यंत पोहचवले.
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडले. लखनौने ७ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या तर मधल्या फळीत निकोलस पूरन याने निर्णायक खेळी केली. मार्शने ३९ बॉलमध्ये ६५ रन्स केल्या तर एडन मारक्रम याने ३८ बॉलमध्ये ६१ रन्स केल्या. पूरनने २६ चेंडूत ४५ धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचता आले नाही.
मुंबई-दिल्ली सामन्याकडे लक्ष
आता २१ मे रोजी मुंबईविरुद्ध दिल्ली यांच्यात होणा-या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील १३ वा सामना असणार आहे. मुंबईच्या खात्यात १४ आणि दिल्लीच्या खात्यात १३ पॉइंट्स आहेत. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफसाठी क्वॉलिफाय करतील. मात्र दिल्लीला मुंबई आणि त्यानंतर २४ मे रोजी पंजाबविरुद्ध अशा दोन्ही सामन्यांमध्ये जिंकावे लागणार आहे.