हैदराबाद : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. सर्व राज्यांच्या पोलिसांना अतिरिक्त सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रासह ६ जणांना अटक करण्यात आली. आता हैदराबाद पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय सूरज उर रहमान आणि २८ वर्षीय सय्यद समीर हे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. दोघेही सौदी अरेबियास्थित आयसिसच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून अटक केली आहे. यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम रहमानला अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान, रहमानने संपूर्ण सत्य उघड केले आणि सय्यद समीरचे नावही घेतले, त्यानंतर पोलिसांनी समीरला हैदराबाद येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि सईद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. दोघांच्याही घरातून बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जाणारा अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर जप्त करण्यात आली आहे. याआधी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. या यादीत युट्यूबर ज्योती मल्होत्राचे नावही समाविष्ट आहे. या सर्वांवर आयसिसचे गुप्तचर एजंट असल्याचा आरोप आहे.