29.9 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहो, भारताने घुसून मारले, शरीफ यांची मोठी कबुली

हो, भारताने घुसून मारले, शरीफ यांची मोठी कबुली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढला. ६ आणि ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकने भारताविरोधात ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले. त्याला जोरदार प्रत्युतर देण्यात आले. पाकिस्तानातील १३ पैकी ११ एअरबेसवर निशाणा साधण्यात आला. स्वत:ला दहशतवाद आणि अणवस्त्रांचा ‘चौधरी’ समजणा-या पाकचे भारताने कंबरडे मोडले. या हल्ल्याच्या ८ दिवसानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचे मान्य केले.

भारताला वारंवार ललकारणारा लष्कर प्रमुख सय्यद असीम मुनीर याला या कारवाईत धूळ चाखावी लागली. शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची माहिती दिली. त्यानुसार ९-१० मे रात्री जवळपास २:३० वाजता जनरल सय्यद असीम मुनीर याने त्यांना कॉल केला. भारतीय बॅलेस्टिक मिसाईल नूर खान एअरबेस आणि काही इतर भागावर डागण्यात आले आणि त्यात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. एअरबेस वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मुनीर याने दिल्याची माहिती शरीफ यांनी दिली.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तान करत होता. पण भारताने नुकसानीचे छायाचित्र जगासमोर मांडली होती. यानंतर पाकिस्तान आणि मुनीर हे सातत्याने त्याचे खंडन करत होते. पण अखेर त्यांनी भारताने घुसून हल्ले केल्याचे त्यात जीवित हानी झाली आणि हवाईतळांचे मोठे नुकसान झाले, हे आता स्विकारत तशी कबुली दिली आहे.

भारताच्या दाव्याला दुजोरा
भारत आणि पाकिस्तान तणावानंतर १० मे रोजी पाकिस्तानकडून गयावया करण्यात आल्या आणि त्यानंतर युद्ध विरामावर सहमती झाली. त्यापूर्वी भारताने एअरबेसवर निशाणा साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचे नूर खान एअरबेस पूर्णपणे नष्ट झाले. हा दावा भारताने त्याच दिवशी केला होता. हा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान हादरून गेला. चीन आणि तुर्कस्तानकडून येणा-या शस्त्रांचा वापर करत याच विमानतळावरून भारताविरोधात मोठे ऑपरेशन राबवण्याचे मुनीरचे स्वप्न आपल्या लष्कराने धुळीस मिळवले. आता शरीफ याने भारताच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR