पुणे : मार्च महिना सुरू होताच आता होळी, शिमगा सणाची तयारी सुरू होते. कोकणात होळी आणि शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती उत्सवाप्रमाणेच होळीसाठीही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात. त्यानुसार, आता ठाणे परिवहन विभागातर्फे होळी आणि शिमग्यासाठी ११ ते १३ मार्च या कालावधीत सुमारे ८५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील ७० टक्के गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
एसटीतील ७० टक्के गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित गाड्यांची आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणा-या शिमगोत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात. मात्र, तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण, समूह आरक्षण, शहरातच एसटीची सुविधा उपलब्ध करून देणे यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
११ मार्च ते १३ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत कोकणातील विविध तालुक्यांमध्ये या गाड्या धावणार आहेत. तर प्रवाशांची अधिक मागणी असल्यास अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागीय परिवहन अधिकारी धनंजय शिंदे यांनी पत्रकारांना दिली. कोकणात जाणा-या गाड्यांचे जिल्ह्यातील विविध आगारांमधून ७० टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे.
समूह आरक्षणही सुरू
तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार गाडीचे समूह आरक्षण देखील केले जाते. यामध्ये समूह आरक्षण केलेल्या प्रवाशांच्या शहरात बस थेट जाऊन त्यांना तेथून त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवते. सद्यस्थितीत ठाणे एसटी विभागातून सुमारे १० गाड्यांचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहितीही देण्यात आली.