नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारताने तयार केलेली वंदेभारत ट्रेन प्रचंड गाजली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उभारलेल्या या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनला अगदी परदेशातूनही मागणी आली. सध्या देशभरात २ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतीय रेल्वेच्या विविध ब्रॉडगेज मार्गांवर लघु आणि मध्यम अंतराच्या एकूण १३६ वंदेभारत धावत आहेत. या सर्व वंदेभारत चेअरकार असणा-या आहेत. त्यामुळे वंदेभारतचा स्लीपर कोचची सोय असलेला प्रोटोटाईप तयार केला असून त्याच्या चाचण्या सुरु आहेत.
देशात आणखी १० वंदेभारत स्लीपर कोचची निर्मिती सुरु असून एकूण २०० वंदेभारत एक्सप्रेसचे टेंडर विविध टेक्नॉलॉजी पार्टनरना देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.
एका अन्य प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की एप्रिल २०१८ पासून भारतीय रेल्वेने आयसीएफ कोचची निर्मिती पूर्णपणे बंद केली आहे. केवळ एलएचबी कोचची निर्मिती यापुढे कारखान्यात होणार आहे. साल २००४-१४ दरम्यान भारतीय रेल्वेने २,३३७ एलएचबी कोचची निर्मिती केली होती. आता साल २०१४-२४ दरम्यान भारतीय रेल्वेने तब्बल ३६,९३३ एलएचबी कोचची निर्मिती केली असून ती आधीच्या निर्मितीपेक्षा १६ पट जादा आहे.
अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ नुसार ‘सुगम्य भारत मिशन’ अंतर्गत भारतीय रेल्वेने दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुखकारक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने देशातील ३९९ रेल्वे स्थानकांवर १,५१२ सरकते जिने, ६०९ रेल्वे स्थानकांवर १,६०७ लिफ्ट बसविल्या आहेत. दिव्यांग प्रवाशांच्या सोयी सुविधेत गेल्या दशकापेक्षा या दशकांत या सेवेत अनुक्रमे ९ आणि १४ पट वाढ केलेली आहे.