लातूर : प्रतिनिधी
महिलांना सिटी बसमधून मोफत प्रवास देणारी लातूर शहर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. आता यासाठी महानगरपालिकेने महिलांना ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केले आहे. त्यासाठी आजपर्यंत १० हजार २५० महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या या १० हजार २५० महिलांना ‘स्मार्ट कार्ड’ मिळणार असून २४ जानेवारीपासून आजपर्यंत २ हजार ५०० महिलांना ‘स्मार्ट कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.
‘स्मार्ट कार्ड’साठी आजपर्यंत शहरातील १० हजार २५० महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ५ हजार ५०० ‘स्मार्ट कार्ड’ प्राप्त झाले आहेत. त्यातील २ हजार ५०० ‘स्मार्ट कार्ड’चे महानगरपालिका मुख्य कार्यालय, गंजगोलाई सिटी बस स्टॉप आणि महात्मा गांधी चौकातील ‘डी’ क्षेत्रीय कार्यालयातून वितरण करण्यात आले आहेत. चार दिवसांत आणखी ३ हजार ‘स्मार्ट कार्ड’ तयार होऊन येतील. ‘स्मार्ट कार्ड’चे वितरण सुरु झाले आहेत. काही दिवसांत १० हजार २५० महिलांना ‘स्मार्ट कार्ड’ मिळतील. लातूर शहर महानगरपालिकेने दि. १८ मार्च २०२२ पासून शहरातील महिलांना १८ सिटी बसमधून मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे महिलांना शहरातील कुठल्याही मार्गावर या योजनेच्या माध्यमातून मोफत प्रवास करता येत आहे. या योजनेचा विद्यार्थीनींनाही फायदा होत आहे. पण, किती महिलांना आणि किती विद्यार्थीनींना या योजनेचा फयदा होत आहे, कोणत्या मार्गावर जास्त प्रतिसाद आहे, याबाबतची माहिती जमा करता यावी म्हणुन ‘स्मार्ट कार्ड’ची कल्पना पुढे आली आहे.
महिलांचा प्रवास सुखकर व्हावा व त्यांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत महिलांना ‘स्मार्ट कार्ड’ योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी महिलांनी महानगरपालिकेच्या केंद्रांवर येऊन नोंदणी करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले होते. त्यानूसार दि. २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १० हजार २५० महिलांनी ‘स्मार्ट कार्ड’साठी नोंदणी केली आहे. यातील २ हजार ५०० ‘स्मार्ट कार्ड’चे वितरणही करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत नोंदणी केलेल्या सर्वच महिलांना ‘स्मार्ट कार्ड’चे वितरण पूर्ण होणार आहे.