पुणे : यंदा तब्बल १२दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे.
मान्सून केरळमध्ये शनिवारी दाखल झाला होता, आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला. काही वेळात हवामान याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलीय.
मान्सूनचे आगमन झाल्यानं शेतक-यांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. दरवर्षी मान्सून साधारणपणे ७ जूनच्या आसपास राज्यात दाखल होत असतो. मात्र, यंदा मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालाय. मान्सूनची तीव्रता पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे. गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून गोव्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. गोव्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोव्यात पडणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रविवारी यलो अलर्ट दिलाय. तर रायगडला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरुय.