34.5 C
Latur
Monday, June 9, 2025
Homeलातूर१३ लाखांची सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त 

१३ लाखांची सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त 

लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात दि. ६ व ७ जून रोजी मध्यरात्री संपूर्ण लातूर जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते.  किल्लारी पोलीस ठाण्याच्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी १२ लाख ९८ हजार रुपयांची सुगंधित तंबाखु वाहनासह जप्त केली. या संदर्भाने दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे हे कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना दि. ६ ते ७ जून रोजी मध्यरात्री एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची पिकअपने वाहतूक करीत आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांनी पथकासह नाकाबंदी पॉईंटला अलर्ट करून रात्री १ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री, वाहतूक, साठवणूकसाठी प्रतिबंधित केलेला ९ लाख ४८ हजार रुपयांची एक्स्ट्रा सुगंधित तंबाखू, ओपल सुगंधी तंबाखू, रत्ना ३००० सुगंधी तंबाखू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाच्या सुगंधित तंबाखूच्या मुद्देमालाची वाहतूक करीत असताना  ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन क्रमांक एम. एच. २५ ए. जे. ९०४४ सह ताब्यात घेण्यात आला.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना दिनेश नवनाथ कांबळे, वय ४० वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि अशोक विठ्ठल कदम, वय ६० वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव या दोघांच्या विरुद्ध किल्लारी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनात, किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार बालाजी लटुरे, येरनवाड, होमगार्ड राठोड, सरवदे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR