चाकूर : प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतून अज्ञात चोरट्यांनी १३ संगणकसंचाची व इतर साहित्यांची चोरी गेल्याची घटना २५ व २६ तारखेच्या मध्यरात्री घडली गुरुवारी (दि.२६) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरटयां विरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक ठसे तपासणी पथकांनी पाहणी करून तपासणी केली. या चोरीच्या घटनेने संस्थाचालकासह नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आले असता त्यांना संगणक कक्षाच्या रुमचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन बघितले असता त्यांना सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरटयांनी शाळेतील संगणक संचासह वस्तू चोरून नेल्याचे दिसून आले. तात्काळ मुख्याध्यापक बालाजी बिराजदार यांनी त्चाकूर पोलीस ठाण्यास माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पी एस आय राजेश घाडगे, पोलिस जमादार योगेश मरपल्ले घटनेची गंभीरता पाहून तात्काळ जि. प. शाळेमध्ये जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी मुख्याध्यापक बालाजी बिराजदार यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल गेला आहे, घटनेचा तपास पोलीस करत आहेत.