निलंगा : प्रतिनिधी
अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात निलंगा पोलिसांनी कारवाई करीत अन्सारवाडा शिवारात गांजासह एका आरोपीस रंगेहात पकडले. चंद्रशेखर सुरेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २ किलो १३५ ग्रॅम गांजा आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत ६७ हजार २५ रुपयांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. अन्सारवाडा शिवारात गांजा विक्रीच्या उद्देशाने एक व्यक्ती येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती निलंगा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित चंद्रशेखर सुरेश पाटील याला त्याच्या एमएच २५ एवाय ९०९६ क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. दुचाकीच्या डिक्कीत तपासणी केली असता त्यामध्ये २.१३५ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीस अटक केली.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी खापरे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोळंके, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रमेश म्हेत्रे यांच्यासह पोलिस हवालदार बालाजी विभुते, गोपाळ बर्डे, दयानंद वासुदेव, दादा शिंदे, महिला पोलिस हवालदार कल्पना साठे तसेच पोलिस अंमलदार श्याम कुंभार, बाळकृष्ण मगर, भीमाशंकर भोसले, प्रदीप एरणवाड आणि प्रकाश चव्हाण यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणा-यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















